Wednesday, January 12, 2011

आमच्या लग्नाचा वाढदिवस

प्रेमपत्र मी लिहिलं तर होतं मग ते पोचलं का, कसं पोचलं, त्याला ते आवडलं का,त्याची प्रतिक्रिया काय झाली.. सगळं काही सांगणार आहे. आता मी लिहिलेला ब्लॉग आलोकनी ( माझा नवरा ) पण वाचला होताच.. पण त्याला नेमकं कळत नव्हतं, की मी खरंच प्रेमपत्र लिहिलं आहे की असंच आपलं ब्लॉग वर टाकलं आहे.

आमच्या लग्नाचा वाढदिवस दोन कारणांसाठी लक्षात राहील.. एक तर वाढदिवस नि दुसरं माझ्या प्रोजेक्ट चा Go-Live..

आलोक अमेरिकेत असल्याने आमच्या लग्नाचा वाढदिवस सुरु झाला 19 Nov IST आणि संपला 19 Nov EST :) सरप्राईज देणे हा प्रत्येकाचा खाऊ नाही..आणि आलोकला तर ते बिलकुल जमत नाही. माझ्या वाढदिवसाला ह्या पठ्ठ्यानी रात्री 10:30 ला मला झोपवून टाकलं आणि स्वतः पण झोपला होता.. मला वाटत होतं काहीतरी बेत करेल.. गिफ्ट तरी देईल.. पण अजून थोड्या वेळानी घोरण्याचा आवाज येऊ लागला मग मी पण झोपून गेले.. त्याला माझ्याकडून नेहमीच सरप्राईज मिळते.. त्यामुळे तो कधी प्रयत्न पण करत नाही असं काही करायचा... मी त्याला काय सरप्राईज देणार याची त्याला जाम उत्सुकता होती. त्यानी मला डायमंड रिंग आधीच गिफ्ट केली होती.. म्हणजे तुला आवडेल ती तू घेऊन ये असं सांगितलं होतं मग मी घेऊन आले, त्याच्या क्रेडीट-कार्ड नी :)

बाकी दिवसाची सुरुवात मोठी छान झाली.. सगळ्यांचे फोन येत होते सकाळ पासूनच.. आज go-live असल्याने ऑफिस दुपारी होतं.. त्याच्या मित्राला मी पत्र इमेल केलं होतं आधीच. त्यानी प्रिंट काढून पाकिटात घालून सकाळी सकाळी त्याला दिलं.. त्याला बिचाऱ्याला काहीच सुचेना कि काय बोलावं.. आधीच बायकोची त्याला खूप आठवण येत होती. त्यात प्रेमपत्र मिळाल्याने  तो थोडा अजून इमोशनल वगैरे झाला.. माझ्या नशिबात हा योग होता आणि माझं प्रेमपत्र योग्य व्यक्तीला मी दिलं याची आणि त्याच्या प्रेमाची पुन्हा एकदा खात्री पटली :)

बाकी दिवसभर गंमत जंमत होत राहिली.. आलोकनी  सरप्राईज द्यायचा केलेला आणखी एक प्रयत्न फसला.. एक मैत्रीण जी घरी केक आणि फुलं पोचवणार होती तिला टीमलीड नी पकडून ठेवलं.. आणि शेवटी तिनं मला फोन केला.. की असं असं तुझं सरप्राईज गिफ्ट घेऊन जा..  हाहाहा.. आलोक थोडा नाराज झाला की बेत फसला...

Go-live मुळे मी रात्रभर ऑफिस मधेच होते आणि तो त्याच्या ऑफिस मधे. पावसानी पण हजेरी लावली होती. मेझ्झा 9 मधे टीम डिनर आणि मग संधीचा पुरेपूर वापर करत आम्ही रात्रभर वेळ मिळेल तशा गप्पा मारल्या :)

हे वर्ष कसं गेलं कळलंच नाही.. एक वर्षात दोघं खूप जवळ आलो.. खूप काही शिकलो.. बरंच भांडलो.. पण.. कुठल्याही गैरसमजांना थारा न देता आम्ही एक वर्ष तर पूर्ण केलं आहे.. आमचं हे प्रेमाचं नातं असंच कायम राहावं एवढीच इच्छा ठेऊन आणि रात्रभराच्या जागरणानी दमून शेवटी मी झोपून गेले.. एकच रुखरुख राहिली ती म्हणजे दोघं बरोबर असायला हवे होतो..

1 comment: